NCP Maharashtra News : शरद पवार गटाच्या सात खासदारांना फोडण्याचे प्रयत्न अजित पवार गटाकडून होत असल्याचा दावा केला जात आहे.
मुंबई : शरद पवार गटाचे लोकसभेतील आठपैकी सात खासदारांना संपर्क करून अजित पवारांसोबत येण्याची ऑफर सुनील तटकरे यांनी दिल्याच्या बातम्या आल्या. यावर खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, “आमच्याकडून अशा प्रकारचा कोणताही प्रयत्न झाला नाही. कुणालाही फोन गेलेला नाही.” तसेच सोनिया दुहान या राष्ट्रवादी नेत्या नसल्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीत अनेक खासदार भेटतात
सुनील तटकरे म्हणाले की, “विधानसभेतील पराभवामुळे त्यांची ताकद किती आहे ते स्पष्ट झाले आहे. मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे. कुणाशीही संपर्क साधलेला नाही. दिल्लीत कार्यक्रमांमध्ये अनेक खासदार भेटतात आणि त्या वेळी काही चर्चा होते. पण, अशा प्रकारचा कोणताही संपर्क आमच्याकडून केलेला नाही.”
कुणी कुठे भेटले हे योग्यवेळी सांगेन
तटकरे म्हणाले की, “हे फक्त चर्चेत राहण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. सोनिया दुहान आमच्या पक्षात नाहीत आणि त्यांना आमच्याकडून कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणार नाही.”
शरद पवारांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न?
शरद पवार गटाच्या खासदारांना फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. सुनील तटकरे यांनी उर्वरित सात खासदारांशी संपर्क साधून अजित पवारांसोबत जाण्याची ऑफर दिल्याचे सांगितले जाते. मात्र, त्या सातही खासदारांनी ही ऑफर नाकारल्याचे समोर आले आहे.
सुप्रिया सुळे नाराज?
या सगळ्या घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेलांकडे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात अजूनही चर्चा सुरू आहे आणि अनेक खासदार याबाबत गौप्यस्फोट करत आहेत.
सोनिया दुहान यांचा सहभाग?
खासदार अमर काळे यांनी सांगितले की, “सोनिया दुहान यांनी खासदारांशी संपर्क साधून विकासकामांसाठी एनडीएमध्ये यावे लागेल, असे सांगितले होते.” सुनील तटकरे यांनी मात्र कुठलाही संपर्क साधला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.